उमेद – शोषणमुक्तीची `प्रयोगभूमी’

>> सुरेश चव्हाण

कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोयनानगर या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील कोळकेवाडी येथे राजन इंदुलकर यांनी 1990 साली ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेची स्थापना करून तिथल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या धनगर, कातकरी, आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू केली. केंद्र शासनातर्फे ‘एन.आय.ओ.एस.’ (राष्ट्रीय मुक्त शिक्षा संस्थान) चे ‘ओबीई केंद्र’ म्हणून मान्यता देण्यात आलेल्या या अनोख्या `प्रयोगभूमी’च्या वाटचालीला 20 वर्षे पूर्ण होत आहेत.

महाराष्ट्रात अनेक आदिवासी पाडे तसेच दुर्गम डोंगराळ भागांत वेगवेगळ्या जाती-जमातींतील मुलांच्या शिक्षणासाठी काही जण काम करताना दिसतात. कोकणात चिपळूण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागातील कोळकेवाडी येथे राजन इंदुलकर यांनी 1990 साली ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेची स्थापना करून तिथल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या धनगर, कातकरी, आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू करायचं ठरवलं. कारण ही मुलं शिक्षणापासून वंचित होती. त्यांचे आई-वडील आजूबाजूच्या सधन शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जातात. नदीत मासे पकडतात. उन्हाळ्यात जमीनदारांच्या आंबा, काजूच्या बागा राखतात व त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मजुरीवर कशीबशी गुजराण करतात. त्यात त्यांचे बरेचसे पैसे दारूच्या व्यसनापायी खर्च होतात. ते एका ठिकाणी स्थिर नसतात. एका गावातून दुसऱ्या गावात त्यांची भटकंती सुरू असते. त्यामुळे मुलांचे धड शिक्षण होत नाही. मुलांचीही त्यांच्या मागे फरपट होत असते. हे ओळखून राजन सरांनी त्यांना एका ठिकाणी शिक्षण घेता येईल, अशी सोय कोळकेवाडी येथे केली आहे.

इंदुलकर यांनी ‘कोळकेवाडी’ या गावात लोक वर्गणीच्या सहाय्याने डोंगराळ भागात 16 एकर जमीन खरेदी करून तिथे ‘प्रयोगभूमी’ हे शिक्षण केंद्र सुरू केले. आजूबाजूच्या गावातील गवळी, धनगर, कातकरी, आदिवासी समाजातील मुलांचे वय वर्षे अठरापर्यंतचे शिक्षण इथे व्हावे अशी येथे व्यवस्था आहे. सुरुवातीला येथे गवळी-धनगर समाजातील मुलांची संख्या जास्त होती, पण हळूहळू समाज औपचारिक शिक्षणात बऱ्यापैकी रुळत गेल्याने त्यांची संख्या कमी होत गेली तर कातकरी, आदिवासी समाजातील मुलांची संख्या वाढत गेली. गेली वीस वर्षे नियमितपणे हे केंद्र सुरू आहे. विशेषत कातकरी समाजातील मुलांना हे केंद्र अधिक उपयुक्त ठरले आहे. प्रयोगभूमीला केंद्र शासनाचा `एन.आय.ओ.एस.’ (राष्ट्रीय मुक्त शिक्षा संस्थान) ची `ओबीई केंद्र’ म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानुसार येथे आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. `प्रयोगभूमी’तील शिक्षणात तीन घटकांचा समावेश केला जातो. शासनाचा शालेय अभ्यापाम त्याच्या पद्धतीप्रमाणे शिकवला जातो; तसेच प्रत्येक शालेय विषय मुलांना पूरक व उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने हाताळला जातो. उदा. भाषा शिक्षणाची सुरुवात मुलांच्या काथोडी, धनगरी या मातृभाषांतून केली जाते. अशा रीतीने सर्व विषयांची मांडणी नावीन्यपूर्णतेने केली जाते.

मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण, यात मुलांच्या कुटुंबातील शेती, पशुपालन, त्यांचे पारंपरिक व्यवसाय, सुतारकाम, बांधकाम, प्लंबिंग त्याचबरोबर संगणक इत्यादी आधुनिक व जीवनोपयोगी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यांना कलाकौशल्यही शिकवली जातात. त्यामध्ये संगीत, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, पाककला त्याचबरोबर मैदानी खेळातही मुलांची चांगली प्रगती आहे. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मी गेलो असता यातील काही मुली या हार्मोनियम वादनाबरोबर शास्त्राrय रागातील बंदिशी उत्तम प्रकारे गाताना दिसल्या. या मुलींची तयारी राजन सरांनी व त्यांच्या शिक्षिकेने केली होती. इंदुलकर यांची कन्या शाहीनने मुलांना चित्रकला शिकवली आहे. या मुलांनी तिथे भित्तिचित्रे काढली आहेत. या शाळेतील संदीप निकमच्या गोष्टीत त्याच्या आजूबाजूचा परिसर, प्राणी, पक्षी, झाडे, मासे, डोंगर, नदी, रान याविषयी आहेत. त्याच्या या गोष्टी ऐकून श्रमिक सहयोगने त्याच्या गोष्टींचे पुस्तक त्याच्या काथोडी भाषेत काढले आहे.

संस्थेने आजवर केलेल्या कामातून हे दिसून येते की, या कष्टकरी समाजाच्या दैनंदिन जगण्यातील अनुभव निसर्गात आणि एकूणच प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्याची ऊर्जा व ज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी केला तर ते अधिक सुलभ होते. या शिक्षणात मुलांचा कृतिशील सहभाग असतो. यामध्ये मोठ्या मुलांनी छोट्या मुलांना शिकवण्यासाठी मदत करणे, सतत नवीन पद्धती तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे शिक्षण प्रािढया अधिक व्यापक व गतिमान होऊ शकते. आपली शिक्षण पद्धती एकारलेली न राहता तिचा सामाजिक व सांस्कृतिक ऊर्जेचा अंतर्भाव आणि उपयोग करणारी असावी, असा संस्थेचा उद्देश आहे. ‘प्रयोगभूमी’च्या वाटचालीला आता वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत प्रयोगभूमीतून 191 मुलं व मुली शिकून बाहेर पडली आहेत. या वर्षी येथे 19 नवीन मुलं दाखल झाली आहेत.

आदिवासी समाजात शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, मुलांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे; ही बाब लक्षात आल्यावर आजूबाजूच्या गावातील आदिवासी पाड्यांना प्रयोगभूमीशी जोडले तर या मुलांचे शिक्षण अधिक सुकर व कसदार होईल याचा सखोल विचार करून संस्थेने मार्च 2021 मध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षण केंद्र चालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या कादवड, आकले आणि ओवळी या तीन गावांतील आदिवासी वाड्यांवर केंद्रे सुरू झाली आहेत. या वाडी शिक्षण केंद्राचे स्वरूप असे असते की, शाळेत जाण्याची वेळ सोडता सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असे मिळून दररोज चार तास अर्धवट शाळा सोडलेल्या तसेच शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी खेळ, वाचन असे कार्पाम घेतले जातात. त्याचबरोबर रविवारी मोठय़ा मुलांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, गप्पागोष्टी, परिसर सहल इत्यादी उपाम घेतले जातात. या उपामात या वर्षी पाच ते अठरा वयोगटातील 102 मुलं दाखल झाली आहेत. या कार्यासाठी शैक्षणिक साहित्य व अन्य संसाधनांसाठी लोकसहभागातून निधी मिळत असतो. शिक्षण केंद्राच्या व प्रकल्पाच्या कामात कारागीर, विशेषज्ञ, अभ्यासक यांची मदत घेतली जाते. मुलांच्या शिक्षणाची फारशी फिकीर त्यांच्या पालकांना नसते म्हणून अशा या कातकरी समाजातील मुलांसाठी ‘प्रयोगभूमी’ कार्य करत आहे.

[email protected]