गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले होते. अनेक भागात पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरतमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. पूरानंतर आता सुरतचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना उपमहापौर व भाजप नेते नरेंद्र पाटील हे शहराची पाहणी करायला आले होते. मात्र चिखलात उतरून पाय खराब होऊ नये म्हणून पाटील यांनी चक्क एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांना पाठिवर घ्य़ायला लावले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने नरेंद्र पाटील यांना पाठिवर घेऊन चिखलातून मार्ग काढत रस्ता ओलांडला. या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सध्या लोकं नरेंद्र पाटील यांच्यावर टीका करत आहेत.
नरेंद्र पाटील हे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करायला सुरत शहरातील लिंबायत भागात आलेले होते. मात्र पाहणी करत असताना एका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होता. त्या चिखलातून गेले तर आपले पाय, शूज व पँट खराब होईल म्हणून नरेंद्र पाटील यांनी तेथे बचावकार्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला पाठीवर घ्यायला लावले.
लिंबायत परिसर हा मिठी खाडी क्षेत्रात येत असल्याने मुसळधार पावसाने या खाडीचा पाण्याचा स्तर वाढला व पाणी शहरात शिरले होते. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली. अनेक भागात कंबरेभर पाणी भरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले होते.