आईस्क्रीमच्या नावाखाली ड्रग्ज विकले, भाजपचा कार्यकर्ता विकास अहिर अटकेत

गुजरातमधील सुरत शहर पोलिसांनी एका प्रकरणात भाजप कार्यकर्ता विकास अहिर आणि इतर दोघांना एमडी ड्रग्ज विकल्याप्रकरणी अटक केली आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या प्रोफाइलनुसार, विकास अहिर हा हिंदू युवा वाहिनी गुजरात राज्याचा माजी अध्यक्ष आहे. यासोबतच ते भाजप युवा मोर्चाशी संबंधित आहेत. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरात एमडी ड्रग्जच्या विक्रीबाबत पोलीस कारवाईची माहिती दिली.

गेहलोत म्हणाले की, पूर्वी सुरतमध्ये ड्रग्जची खेप मुंबईतून यायची, पण पोलिसांच्या कडक कारवाईनंतर या व्यवसायात गुंतलेल्यांची मोडस ऑपरेंडी बदलली आहे. आता ते राजस्थानमार्गे सुरतमध्ये ड्रग्ज विकत आहेत. पोलिसांनी विकास अहिरसह चेतन साहू आणि अनिश खान पठाण यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 354 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

सुरत पोलिसांनी ड्रग्ज विक्री प्रकरणी विकास अहिर आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केलं आहे. 2022 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या नावाखाली हाच गट त्यांच्या घरी पोहोचला होता असं इटालिया यांनी म्हटलं आहे.

सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी म्हटले आहे की, आरोपी आईस्क्रीमच्या नावाखाली ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. तो दुचाकीवरून ही डिलिव्हरी करायचा. गेहलोत म्हणाले की, अलीकडच्या काळात सुरतमध्ये ड्रग्ज विक्रीचे 37 गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण 85 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मालमत्तेचीही चौकशी सुरू असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. बेकायदेशीर आणि काळ्या पैशातून मिळवलेली मालमत्ता सील केली जाईल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

ड्रग्ज विकल्याप्रकरणी सुरत पोलिसांनी अटक केलेल्या विकास अहिरने सोशल मीडियावर हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. X वर, अहिर याने त्याच्या बायोमध्ये लिहिले आहे की तो हिंदू युवा वाहिनी, गुजरात राज्याचा माजी अध्यक्ष आहे. यानंतर अहिर याने आपण भाजप युवा मोर्चा गुजरातशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. अहिर यांनी त्यांच्या बायोमध्ये स्वतःला आरएसएस स्वयंसेवक म्हणूनही वर्णन केले आहे. सुरत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास महिनाभर माहिती घेतली आणि पाळत ठेवल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही एकूण गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज राजस्थानमार्गे सुरतला आणले जात होते.