ईडीने राजकीय सूडभावनेने केलेल्या अटकेला आव्हान, सूरज चव्हाण यांची हायकोर्टात याचिका

कोरोना काळातील खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ईडीच्या कारवाईला आव्हान दिले आहे. ईडीने राजकीय सूडभावनेने अटकेची कारवाई केली. त्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा आली असून न्यायालयाने अटकेचा आदेश रद्द करावा, अशी विनंती सूरज चव्हाण यांनी याचिकेतून केली आहे. ते मागील आठ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

सूरज चव्हाण यांच्या वतीने ऍड. हर्षद भडभडे यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 24 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागतानाच स्वतंत्र याचिका दाखल करून ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. अटकेच्या कारवाईचा छळवणूक, राजकीय छळवादासाठी शस्त्र म्हणून वापर करता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात स्पष्ट केले आहे. याचा संदर्भ देत सूरज चव्हाण यांनी ईडीची कारवाई बेकायदा ठरवून रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच ईडीने केलेल्या बेकायदा अटकेप्रकरणी भरपाई मंजूर करण्याचीही विनंती केली आहे.

याचिकेत केलेले दावे

z मला राजकीय सूडभावनेतूनच सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केले आहे. यासाठीच ईडीचा अत्यंत वाईट हेतूने वापर करून मला अटक केली आहे.

z ईडीने नेमक्या कोणत्या गुह्यासाठी अटक केली आहे हे ठाऊक नाही. असे असताना मागील 8 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले आहे.