रस्त्यासाठी कडक उन्हात सुप्रिया सुळे यांचा ठिय्या, बनेश्वर-नसरापूर रस्त्याची डागडुजी करा

गेले सहा महिने पाठपुरावा करत असलेल्या भोर तालुक्यातील बनेश्वर ते नसरापूर या दीड किलोमीटर रस्त्याची डागडुजी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तब्बल पाच ते सहा तासांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेकडून 2 मेपासून या रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

आंदोलनाबद्दल भूमिका स्पष्ट करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बनेश्वर हे आस्थेचे ठिकाण आहे. मागच्या सहा महिन्यांपासून बनेश्वर ते नसरापूर रस्त्याचा पाठपुरावा करत आहे. दीड किलोमीटरचा रस्ता, पण सरकार यासाठी छळत आहे. येथील नागरिक नवीन रस्ता मागत नाहीत. रस्त्यावर खड्डे पडले असून त्याची डागडुजी केली जावी, अशी मागणी आहे. दुर्दैवाने हे सरकार डागडुजीसुद्धा करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रमेश थोरात, माजी नगरसेवक विशाल तांबे, विजय कोलते, स्वाती पोकळे यांच्यासह बनेश्वर भागातील नागरिक या वेळी उपस्थित होते.

पीएमआरडीएच्या मध्यातून 900 कोटींचा नवीन प्रकल्प बांधण्यात येत असल्याचे सांगत आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. यात राजकारण आणायचे नाही, असे सांगून सुळे म्हणाल्या, हा श्रद्धेचा विषय आहे. महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याची डागडुजी करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

हॉस्पिटल प्रशासनावर हत्येचा गुन्हा दाखल करा

दीनानाथ रुग्णालय प्रकरणी  डॉक्टरांची चूकच आहे. हा हत्येचा प्रकार असून साडेपाच तास ती महिला कळा देत होती. तिला रक्तस्राव होत होता. तिला तयारी करून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले ही हत्याच आहे. मुख्यमंत्र्यांनी यात कारवाई करावी. पुटुंबाला न्याय द्यावा, असेही खासदार सुळे म्हणाल्या. आम्ही 27 कोटींच्या थकबाकीप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने रुग्णालयाला वसुलीची नोटीस पाठविल्याची सुळे म्हणाल्या.