लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपसात भांडणं करण्यासाठी नाही? नागरिकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी निवडून दिलंय. मला खरचं या विषयांचा उबग आला आहे. कोण कुठला पालकमंत्री, कुठलं डिपार्टमेंट, रुसवेफुगवे, प्लीज ही घरची स्टोर नाही. ही देशाची आणि राज्याची सेवा आहे, गंभीरते घ्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. पालकमंत्र्यांच्या निवडीला रातोरात स्थगिती दिली जाते, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे रुसवेफुगवे यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला.
हार्वेस्टरच्या चौकशीचं काय झालं?
दोन महिने झाले हे सरकार येऊन, मला उबग आला आहे या सगळ्या गोष्टींचा. दोन महिन्यांत या सरकारने आल्यापासून काय धोरणात्मक निर्णय घेतले? हार्वेस्टरच्या चौकशीचं काय झालं? शेतकऱ्यांच्या पिकविमाचा निर्णय काय झाला? लाडक्या बहिणींना अडीच की तीन हजार रुपये कधी देणार? महागाई नियंत्रणासाठी काय करणार, येणाऱ्या अर्थसंकल्पात काय करणार? गतीमान सरकार मग आमचे रस्ते गतीमान का होत नाहीये? का कंत्राटदारांना वेळेवर पैसे दिले जात नाही? का आमची सर्व कामं डिलेड आहेत? का कॉस्ट एस्केलेशन होतंय? गडकरीसाहेब रस्ता कमी खर्चात करतात, मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का कमी खर्चात होत नाही? असे एकामागून एक सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड केली.
‘हे पहिल्यांदा बघतेय राज्यात आणि देशात’
ह्यांच्याच सरकारने केलेलं स्पोर्ट्स मंत्रालयाने 600 ते 700 कोटींचं कंत्राट रद्द केलं. मुख्यमंत्र्यांना पत्र लहिणार आहे. तुमच्या दोन सरकारमध्ये आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये हा विरोधास का आहे? तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता. आता मुख्यमंत्री आहात. तुमच्या सरकारमधले मंत्री म्हणताहेत की स्पोर्ट्स मंत्रालयात सहाशे-सातशे कोटी रुपयांचं चुकीच्या पद्धतीने टेंडरींग झालेलं आहे. हा गंभीर विषय नाही का? अशी अनेक टेंडर्स आहेत, जी कॅन्सल झाली आहेत हे सरकार येऊन. या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. भरकटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत राहतात, असं वाटतंय. हे सरकार एन्टायटलमेंटमध्ये आहे, असं हळूहळू वाटायला लागलं आहे. मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे. मला हेच पालकमंत्री पाहिजे. हे पहिल्यांदा बघतेय राज्यात आणि देशात. कुठल्याही राज्यात आणि देशात असं ऐकलेलं नाही. हे निराशाजनक आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.