
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम भरली नाही म्हणून नऊ महिन्यांच्या गर्भवती तनिषा भिसे यांना उपचार नाकारण्यात आले. दरम्यान उपचार मिळायला उशीर झाल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त करत ‘तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला नसून ही हत्या आहे’ असे त्या म्हणाल्या.
ही घटना अत्यंत दुर्दैवी व अस्वस्थ करणारी घटना आहे. माणूसकी राहिली आहे की नाही. या प्रकरणाचा अहवाल आला असून त्यातून रुग्णालयाची चूक असल्याचे स्पष्ट होत आहे. ही तनिषा भिसेंची हत्या आहे. रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, तनिषा भिसेंना न्याय मिळालाच पाहिजे. रुग्णालयावर कारवाई करायला काय आता दहा समित्यांच्या अहवालाची वाट पाहणार का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला.