शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 90 टक्के लोकं भाजपात, सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 90 टक्के लोकं भाजपत असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमित शहा यांनीच देशाला सांगावे की, ज्यांच्यावर अमित शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आज भाजपत आहेत. त्यातले 90 टक्के लोकं आज भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री तरी आहेत नाहीतर पदाधितकारी तरी आहेत. आमच्यासोबत अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपने केले होते. डर्टी डझनची लिस्ट काढा आणि असे किती नेते महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांची चक्की पिसींग लाईन होती. त्याच्यामुळे सगळा डेटा काढून तुम्हीच टॅली करा असा टोलाही यावेळी लगावला.

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डेटा दाखवावा आणि त्यांनी सिद्ध करावे. ते म्हणतील तिथे मी चर्चेला बसायला तयार आहे. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबाबत आमची भूमिका आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दहा वर्षापूर्वी आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस बोलले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. या घोषणेचे काय झाले, असा सवलाही त्यांनी केला.