शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर काय बोलता, बीड, परभणीच्या दहशतीवर बोला, असा जोरदार हल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चढवला.
एवढं यश मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाइनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी, पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
अन्याय, अत्याचार होत असताना गप्प बसायचे का?
बीड प्रकरणात आम्ही राजकारण आणलेले नाही, आणणार नाही. वाल्मीक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांसह सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळय़ांनीच या गोष्टी सांगितल्या. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. इथे अन्याय, अत्याचार होताना गप्प बसायचे का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.