‘भ्रष्टाचाराचे आरोप मोदी, फडणवीस यांनीच केलेले; त्यामुळे…’, सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांनी खोडून काढले. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेची निवडणूक दोन-तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकारने जुमल्यांचा पाऊस पाडला, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तसचे अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तरही भारतीय जनता पक्षाने द्यावे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्यावर आरोप केले होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही. यावर महायुतीने उत्तर दिले पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप भाजपच्याच लोकांनी केले होते. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी अजित पवारांवर आरोप केले होते. ट्रकभरून पुरावे, गुन्हे दाखल करणार, तुरुंगात टाकणार हे फडणवीस म्हणत होते. त्यामुळे त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

माझ्या तीन बहिणींवर छापे टाकण्यात आले. त्यांचा काय संबंध होता? भाजप आणि आयटी, सीबीआय, ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजुट असताना छापे टाकले, त्याला सत्तेत असणारे लोकं जबाबदार आहे. आयटी, सीबीआय आणि ईडी हे वाशिंगमशीन सर्वांनाच माहिती असून अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर महायुतीनेच द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

‘लाडकी बहीण’ योजनेवरून श्रेयवादाची लढाई, अजित पवार जाहिरातीतून गायब