ईडीपासून सुटका मिळवी यासाठीच भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केल्याचा उल्लेख ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यावरून राजकारण तापले आहे. राजकीय वर्तुळातही यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केले असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर हल्ला चढवला.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष आणि घर फोडण्याचे काम अदृष्य शक्ती करत आहे. गेल्या दोन वर्षापासून आम्ही हे सांगत असून फक्त महाराष्ट्रच नाही तर कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हेच सुरू आहे. 95 टक्के ईडी, सीबीआयचे छापे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पडले असून ज्यांच्यावर आधी भाजपने आरोप केले नंतर त्यांच्यासोबतच सत्तेत बसले.
दिवंगत आर.आर. पाटील यांच्यावरही सगळ्यांनी मिळून आरोप केले. त्या फाईलवर शेवटची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. त्यावर त्यांचीच सही होती. मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्याविरोधात ही कारवाई सुरू झाली त्याच अजित पवारांना घरी बोलावून ती फाईल दाखवण्यात आली. हा गुन्हा असून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला भरला पाहिजे. फडणवीसांना राज्यातील जनतेची फसवणूक केली असून या सगळ्यांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
विकासासाठी कोणीही भाजपसोबत गेले नाही, रोहित पवार यांचा हल्लाबोल