70 हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही हे फडणवीसांनी सांगावे!- सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी होतं. याबाबत मी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून माफी मागितली. हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्यामुळे या सगळ्याचे उत्तर फडणवीस यांना द्यावं लागेल. 70 हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही झाला हे सांगायला पाहिजे, असे प्रत्युतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

तासगाव-कवठेमहांकाळ येथील एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. ती सही मला फडणवीसांनी दाखवली, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सिंचन घोटाळ्याचा 70 हजार कोटींचा आरोप झाला तेव्हा आमचा पक्ष एक होता. आम्ही सगळेच एकत्र काम केलं, आर. आर पाटील यांना मानलं पाहिजे, विरोधी पक्षांनी जेव्हा घोटाळ्याचा आरोप केला तेव्हा चौकशी राज्याच्या हिताची झाली पाहिजे असं वाटलं असेल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. इमानदार व्यक्ती म्हणून आर. आर. पाटील यांनी सही केली असेल. आता या घोटाळ्यात काही होतं की नव्हतं हे सांगायला पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा तुम्ही मंत्री होता तेव्हा गोपनीयतेची शपथ घेता. शपथेत फाइल दाखवायची मुभा नसते, मग फडणवीसांनी अजित पवारांना फाइल कशी दाखवली? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यामुळे या सगळ्याचं उत्तर फडणवीस यांना द्यावं लागेल. 70 हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही झाला हे सांगायला पाहिजे.