आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा, आव्हानांवर मात करुन सत्याचाच विजय होईल- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. शरद पवार साहेब यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. तर, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत भारताचं संविधान हाती घेतलं होतं. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. ईडी कार्यालयाबाहेर मोठी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.

सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर प्रसार माध्यमांची बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल. हा काळा आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हानावर मात करून संघर्ष करून, पण सत्याच्या मार्गाने चालू. यंशवतराव चव्हाण यांचा वारसा आहे. तो पुढे नेहण्याचे काम शरद पवार साहेब यांनी सहा दशके केले आहे. ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संसदेचा डेटा सांगतो की, 95 टक्के केसेस ईडी, प्राप्तिक कर विभागाचे सर्व केसेस विरोधकांवर आहे. यासाठी ज्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे रोहित पवारला नोटीस येणे ही फार आश्चर्यची गोष्ट नाही. रोहित पवारने मोठी संघर्ष यात्रा काढील असून तो राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, सोशित पीडित आणि वंचितांसाठी काही तरी करू पाहतोय. त्यामुळे कदाचित हे सूडाचे राजकारण असू शकते अशी भावना लोकांमध्ये आहे असे सुप्रिया सुळे म्हटल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे शक्ती प्रदर्शन नाही. सर्व गोष्टी या शक्तीने होत नाही. यात प्रेम आणि नातीही असतात. रोहित पवारांनी महाराष्ट्रातील युवापिढीसाठी कामे केली आहे. त्यामुळे रोहित पवारांन बद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आस्थाही आहे. आपला हा भाऊ लढत असेल तर त्यासाठी येथे यावे यात गैर काय आहे? या देशात अजूनही लोकशाही आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चौकशीला पूर्ण सहकार्य करणार -आमदार रोहित पवार

मी एवढंच सांगेन अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जी कागदपत्रे मागवली ती सगळी कागदपत्रं दिली आहेत. आज पुन्हा मला येथे चौकशीसाठी बोलावलं. तेथे जाऊन मी पुन्हा त्यांना माहिती देईन. अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करेन. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ते त्यांचं काम करतात. त्यांच्या मागे कुठला विचार, कुठली शक्ती आहे, याबाबत आज तरी सांगता येणार नाही. परंतु सामान्य लोकांसोबत चर्चा केल्यानंतर असं समजते की, सर्वसामान्यांचा आवाज महाशक्तीविरोधात उठवल्यानंतरच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. आतापर्यंत जी माहिती मागवली आहे, ती सीआयडीला, ईडीलासुद्धा दिलेली आहे. परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी ईडी कार्यालयात जात आहे. तेथे अधिकाऱ्यांची चालती असेन असे रोहित दादा पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, चूक केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय? त्यांनी मला नुसतंच बसवून ठेवलं तर मला मोकळा वेळ मिळेल आणि त्या वेळेत मी सरकार विरोधात कशापद्धतीने रणनिती आखायची याबाबत विचार करेन. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय करता येईल याबाबत कार्यालयात वेळ मिळाला तर चर्चा करेन असेही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, ऑफीसमधून आल्यानंतर राष़्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने काय करता येईल याबाबत चर्चा करेन. सोबतच मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा सर्वसामान्य माणूस आहे. मराठा माणूस म्हणून प्रामाणिकपणे लढत राहणार पळून जाणार नाही असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार ईडी कार्यालयात जी फाईल घेऊन जात आहेत. त्यावर महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो लावले आहेत. त्यावर विचारांचा वारसा असेही लिहिले आहे.

आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीला जाणार असल्याने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांकडून रोहित दादा पवार यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज… शरद पवार, एकच वादा रोहित दादा… अशा घोषणा देण्यात आल्या आहे.

बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘पळणार नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले आहेत.