मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. हत्या झाल्यापासून ते फरार होते. गेल्या 25 दिवसांपासून ते पोलीस आणि सीआयडीला गुंगारा देत होते. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.
शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी उशिरा का होईन सापडले. पण या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातून अटक कशी होते. पोलिसांनी या संदर्भात एक अधिकृत स्टेटमेंट जारी करून माहिती द्यावी. कारण आता ही महाराष्ट्राचीच बातमी राहिली नसून या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही समोर येऊन पारदर्शक, खरे स्टेटमेंट द्यावे.
Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले प्यादा, मुख्य आरोपी ‘आका’, सुरेश धस यांचा इशारा कुणाकडे?
याआधी संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात 23 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मीक कराड शरण आला होता. पुण्यातील सीआयडी मुख्यालयात एका चारचाकी गाडीतून तो आला होता. त्यानंतर त्याला केजच्या न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता याच प्रकरणातील आणखी दोन आरोपींनाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर अन्य एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप मोकाट आहे.