सरकारने थोडातरी संवेदनशीलपणा दाखवावा, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने न्याय मिळालाच पाहिजे; सुप्रिया सुळेंनी सुनावले

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस, प्रकाश साळुंके यांच्यासह अनेकांची भावना आहे की त्यांनी (धनंजय मुंडे ) राजीनामा द्यावा. सरकारने संवेदनशीलपणे या सर्वांचा विचार करावा, असे सुप्रिया सुळे म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले त्यावेळी नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं? पण गेल्या 28 दिवसांपासून रोज मीडियामध्ये हे प्रकरण समोर येत आहे. आणि त्या कुटुंबांचे अश्रू, त्या मुलीचे भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ होतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

आम्ही कुणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनीही काल म्हटलंय. अंजली दमानिया, सुरेश धस जे काही बोलत आहेत, हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. काही विषय आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. माणुसकी आहे की नाही या राज्यात? हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहु, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रा आहे. या महाराष्ट्रात त्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने न्याय हा मिळालाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे हिंदुस्थानच्या मीडियात हे प्रकरण समोर येत आहे. मनं आणि मतभेद बाजूल ठेवून सर्व पक्षाचे नेते एकत्र आलेत. हा एक आशेचा किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घ्यायचा हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं, असे त्या पुढे म्हणाल्या.

नैतिकतेने निर्णय घ्यावा. ही एक घटना आहे यात कुणालाही राजकारण नको आहे. या प्रकरणात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे. परभणी आणि बीडच्या घटनेत कोणीही राजकारण करू नये. तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा, एवढीच आपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.