‘गतिमान’ मिंधे सरकारचा वेग ‘गोगलगाई’चा! बघा, फडणवीसांनाही असंच वाटतं!

आमचे गतिमान सरकार आहे असा दावा मिंधे सरकारकडून सातत्याने केला जातो. मात्र सरकारच्या कामकाजात तसा अपेक्षित वेग दिसतच नाही. अगदी मिंधे सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तसंच वाटतंय. सरकारचा वेग गोगलगाईसारखा असल्याची जाहीर कबुलीच त्यांनी आज दिली.

मिंधे सरकारने सत्तेवर आल्यानंतर आमचे सरकार सर्वसामान्यांचे गतिमान सरकार आहे अशा बढाया मारल्या होत्या. सरकारी जाहिरातींवरही मिंधे सरकारचे ते ब्रीदवाक्य बनले. पण या सरकारमध्ये सर्वसामान्यांची कामेच होत नसल्याचे सरकारी कार्यालयांमध्ये साचलेल्या फायलींच्या ढिगांवरून समोर आले आहे. त्यासंदर्भात सरकारमधील घटक पक्षांकडूनही अनेकदा तक्रारी केल्या जातात. आज देवेंद्र फडणवीस यांनीही ते वास्तव जाहीरपणे स्वीकारले.
नागपूर येथील रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये फाईल असते तिला गोगलगाईची पावले असतात. गोगलगाईच्याच पावलानेच ती पुढे जाते. ती पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय ती पुढे जातच नाही. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच सरकारच्या नाकर्तेपणाची अशी कबुली दिल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या… खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा आधार घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगाईचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढं जाण्यासाठी धक्का मारावा लागतो हेसुद्धा त्यांनी कबूल केलं. थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतिमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय. असे सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर नमूद केले.

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।’ खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.