
भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानला जाणाऱ्या 700 मीटर रस्त्याच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सात तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छा असेल तर तो निधी खासदार निधीतूनदेखील करता येतो, अशी टीका केली होती, त्याला सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रामध्ये रस्त्यांसाठी आम्हाला त्रास होत नाही. नितीन गडकरी हे आम्हाला प्रचंड मदत करतात तसेच सी. आर. पाटीलदेखील जलजीवन मिशनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात. मात्र, हा रस्ता जिल्हा परिषदअंतर्गत येतो. 23 लाख मतदारांच्या कामांसाठी पाच कोटींचा खासदार निधी करतो का, असा सवाल देखील केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशातील सर्वच खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की, आमचे मतदारसंघ 23 लाख लोकांचे आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधित्व करते त्या बारामती लोकसभा मतदारसंघात नऊ तालुके आणि 23 लाख मतदार आहेत आणि त्यासाठी फक्त 5 कोटींचा निधी खासदारांना मिळतो, तो कशासाठीच पुरत नाही. खासदार निधीतून शाळांना, रस्त्यांना पैसे द्यायला पुरत नाहीत. त्यामुळे आम्ही अनेक खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती केली आहे.
शहरातील एक नगरसेवक पाच कोटींचा पूल बांधतो, त्यामुळे आम्हाला खासदार म्हणून पाच कोटींचा निधी पुरत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विस्तार पाहिल्यास 23 लाख लोक आणि नऊ तालुके या मतदारसंघातील लोणावळ्यानंतर आंबी गावापासून या मतदारसंघाची सुरुवात होते ते इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यापासून नगरपर्यंत हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इतकी महागाई झाली आहे की, पाच कोटी रुपये लगेचच संपतात. केंद्रामध्ये आम्हाला रस्त्यांसाठी त्रास होत नाही. कारण केंद्रात नितीन गडकरी हे आम्हाला प्रचंड मदत करत असतात तसेच सी. आर. पाटीलदेखील जलजीवन मिशनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात. मात्र हा रस्ता जिल्हा परिषदअंतर्गत येतो. त्यामुळे पाच कोटींसारख्या एवढा कमी निधी कोणत्याच गोष्टीला पुरत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.