
मुंबईसह देशभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेल्या आणि ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषक स्पर्धेला बुधवारी दिमाखात सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला. कलिना येथील एअर इंडिया मैदानावर पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत सुप्रिमो चषकावर आपले नाव कोरण्यासाठी देशभरातील 16 संघ मैदानात भिडणार आहेत.
टेनिस क्रिकेट स्पर्धेला वेगळय़ा उंचीवर पोहोचवण्यात सुप्रिमो चषक स्पर्धेचा मोठा वाटा आहे. गेल्या 11 वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. बुधवारी सायंकाळी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी दिमाखदार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले खेळाडू, भव्यदिव्य स्टेज, प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेले स्टेडियम, ढोल ताशा पथकांचे सादरीकरण, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी असा उत्साही माहोल यानिमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे, अविनाश गोवारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजच्या सुप्रिमो लढती
7 वा. दीपक दादा प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) वि. बालाजी क्लब (मुंबई)
9 वा. एंजल धमाका (कोलकाता) वि. विक्रोलियन्स रोहित इलेव्हन (मुंबई)
सुरुवातीला ही स्पर्धा फक्त मुंबईपुरती मर्यादित होती. गेल्या नऊ वर्षांपासून देशभरातील टेनिस क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यंदाच्या पर्वात मुंबईतील सहा आणि इतर राज्यांतील दहा संघ खेळणार आहेत. दरवर्षी या स्पर्धेचा वाढता आलेख पाहता पुढच्या पर्वात देशाबाहेरील म्हणजेच श्रीलंका, दुबई, सौदी येथून आलेले स्पर्धक या स्पर्धेत खेळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. सहभागी संघ, प्रेक्षक आणि आयोजक यांच्या मेहनतीचे हे फलित आहे. – संजय पोतनीस, आयोजक-आमदार
देशभरात ‘सुप्रिमो’ची ख्याती
सुप्रिमो चषकाच्या अकराव्या सीझनला शानदार आणि दिमाखदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. एखादी गोष्ट सुरू करणे खूप सोपे असते, पण ती टिकवणे आणि तिचे वैभव वाढवत नेणे हे खूप कठीण असते. अनिल परब, संजय पोतनीस आणि त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी ही स्पर्धा एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवली आहे. देशभरात ही स्पर्धा बघितली जाते. भविष्यात या स्पर्धेची फायनल केवळ ब्रेबर्न किंवा वानखेडे स्टेडियमवर न होता दिल्लीत झाली पाहिजे, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
रिगल आणि मराठा बॅण्डचे सादरीकरण
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाच्या सुरुवातीला पुर्ला येथील रिगल बॅण्डने ‘देवा श्री गणेशा’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ही गाणी सादर केली. तर सांताक्रुझ येथील मराठा ढोल ताशा पथकाच्या तालबद्ध ढोल ताशांनी वातावरण भारावून टाकले.
महिला प्रेक्षकांसाठी राखीव कक्ष
सुप्रिमो चषकाचा लोगो लाल आणि सफेद रंगाचा आहे. हीच रंगसंगती वापरून स्टेडियममध्ये सजावट करण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल 15 हजारांहून अधिक प्रेक्षक बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकणार आहेत. तसेच महिला प्रेक्षकांना मॅचचा आनंद लुटता यासाठी राखीव कक्ष तयार करण्यात आला आहे.
क्रिकेटप्रमाणे राजकारणातही आयपीएल
एकीकडे आयपीएलचे सामने सुरू झाले आहेत. दुसरीकडे आजपासून तेवढय़ाच तोडीची सुप्रिमो चषक स्पर्धा सुरू झाली आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आहे तसेच ते राजकारणातदेखील आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघात आहे हे कळत नाही, अगदी त्याचप्रमाणे सध्याच्या राजकारणात कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे कळत नाही. निदान क्रिकेटमध्ये लोकांचे मनोरंजन होते, पण राजकारणात तसे होत नाही, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
स्पर्धेतील सामने आठ षटकांचे असून दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून तीन सामने खेळवले जाणार आहेत. 13 एप्रिलला सेमीफायनल आणि फायनलचे सामने होणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि एअर इंडिया यांचे सहकार्य या स्पर्धेस लाभले आहे.