सुप्रिमो चषकाचे काऊंटडाऊन सुरू; ठरलं तर…कोणता संघ, कुणाशी भिडणार

‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सुप्रिमो चषका’चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 9 ते 13 एप्रिल या कालावधीत सांताक्रुझ पूर्व येथील एअर इंडिया मैदानावर  सायंकाळी 7 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. गुरुवारी या स्पर्धेसाठी ड्रॉ काढण्यात आला असून निवड झालेल्या 16 संघांपैकी प्राथमिक फेरीसाठी कोणत्या संघाचा कुणाशी सामना होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस गेल्या अकरा वर्षांपासून सुप्रिमो चषकाचे आयोजन करीत आहेत. सुप्रिमो चषकामुळे टेनिस क्रिकेट स्पर्धेला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. यंदा या स्पर्धेसाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर 65 टीमने नोंदणी केली होती. त्यातील पात्र 16 टीम विजेतेपदासाठी मैदानात एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे करणार आहेत. हा रणसंग्राम ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमींची मोठी उपस्थिती असणार आहे.

उद्घाटन सोहळय़ाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

सुप्रिमो चषक स्पर्धेचे उद्घाटन 9 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी कसोटी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार भाई जगताप, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आजी-माजी रणजीपटू, सिनेकलाकार यांचीही उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी ग्राऊंड तयार करण्यापासून ते प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था, कमानी लावणे अशी तयारीला आता वेग आला आहे.

n प्रत्येक दिवसाचा एक संघ याप्रमाणे चार दिवसांच्या सामन्यातील चार विजेते संघ सेमी फायनलला पोहोचणार आहेत. सेमी फायनलला पोहोचलेल्या संघात ड्रॉ टाकून त्यांच्यात होणारे सामने निश्चित केले जाईल. त्यानंतर 13 एप्रिलला अंतिम फेरी होणार आहे.

आंतरविधानसभा चषकाचा थरार आजपासून 

एअर इंडिया मैदानावर शुक्रवारपासून आंतरविधानसभा सुप्रिमो चषकाचा थरार रंगणार आहे. टेनिस क्रिकेटच्या या तीनदिवसीय स्पर्धेत कलिना विधानसभेतील 16 टीम विजेतेपदासाठी भिडणार आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

प्राथमिक फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

9 एप्रिल

सायंकाळी 7 वाजता ताई पॅकर्स, पालघर विरुद्ध एल. के. स्टार, राजकोट

सायंकाळी 9 वाजता डिंग डाँग (रेड डेव्हिल्स), पुणे विरुद्ध यु. एस. इलेव्हन, मुंबई

10 एप्रिल

सायंकाळी 7 वाजता दिपक दादा प्रतिष्ठान/ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री, सिंधुदुर्ग  विरुद्ध बालाजी क्लब, मुंबई

सायंकाळी 9 वाजता एंजल धमाका, कोलकाता विरुद्ध विक्रोलियन्स रोहित इलेव्हन, मुंबई

11 एप्रिल

सायंकाळी 7 वाजता सुलतान ब्रदर्स पायराईट्स, केरळ विरुद्ध रायगड ट्रायडेंट, रायगड

सायंकाळी 9 वाजता  एफ. एम. हॉसपेट, कनार्टक विरुद्ध शांतीरत्न, डोंबिवली

12 एप्रिल

सायंकाळी 7 वाजता    रार हॅरी रिबडा, राजकोट विरुद्ध दुर्गापूर फ्रेंडस् युनियन क्लब, कोलकाता

सायंकाळी 9 वाजता  पंधारी किंग्ज, मुंबई  विरुद्ध एस. टी. प्रहार इलेव्हन, पुणे