डिंग डाँग सुप्रिमो चषकाचा किंग काँग, अखेर कृष्णा सातपुतेचे सुप्रिमो चषक जिंकण्याचे स्वप्न साकार; अंतिम सामन्यात कोलकात्याच्या दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबचा उडवला धुव्वा

सर्व छायाचित्रे ः संदीप पागडे

गेल्या दहाही हंगामांत सुप्रिमो जेतेपदाने हुलकावणी दिली होती, मात्र अकराव्या हंगामात डिंग डाँगच सुप्रिमो चषकाचा किंग काँग असल्याचे कृष्णा सातपुतेने दाखवून दिले. कोलकात्याच्या दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबचा 7 विकेट आणि 19 चेंडू राखून धुव्वा उडवत पुण्याच्या डिंग डाँग रेड डेविल्स अमर साई संघाने सुप्रिमो चषक आंतरराज्य टेनिस क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरले. 7 धावांत दुर्गापूरचा अर्धा संघ गारद करणारा सॅण्डी ऊर्फ संदीप यादव डिंग डाँगच्या जेतेपदाचा शिल्पकार ठरला. मात्र मालिकेत 13 विकेट टिपणाऱ्या सुर्वोनिल रॉयने मालिकावीराचा बहुमान पटकावत कार जिंकली.

सुप्रिमो चषकाची भन्नाट क्रेझ काल अवघ्या मुंबईने अनुभवली. एकीकडे आयपीएलचा थरार आणि विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा थरारक सामना सुरू असतानाही एअर इंडियाच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचा सागर उसळला होता. मध्यरात्री दोनच्या ठोक्यालाही तब्बल 20 हजार क्रिकेटप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि या गर्दीत डिंग डाँगने साकारलेले जेतेपदाचे स्वप्न क्रिकेटप्रेमींनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मात्र हा थरार पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांना टी-20 चा खरा थरार अनुभवता आला नाही.

पहिल्या उपांत्य सामन्यात डिंग डाँगने बालाजी क्लबचा 4 चेंडू आणि सहा विकेटनी धुव्वा उडवला. बालाजीचे फलंदाज डिंग डाँगच्या भेदक माऱ्यापुढे 8 षटकांत 9 बाद 56 असे माफक आव्हानच उभारू शकले आणि डिंग डाँगच्या कृष्णा सातपुते आणि एजाझ कुरेशीने 25 धावांची सलामी देत संघाला अर्धी मजल मारून दिली. त्यानंतर विजयी धाव काढण्यासाठी डिंग डाँगला फारसे कष्ट करावे लागले नाहीत. तसेच दुसरा उपांत्य सामनाही एकतर्फीच झाला. कर्नाटकाच्या एफएम हॉस्पेटला सुर्वोनिलच्या माऱ्यापुढे 58 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि दुर्गापूरच्या मुन्ना शेख आणि सरफराज बाहुबलीने बिनबाद विजयी लक्ष्य गाठत एफएम हॉस्पेटचा सहा षटकांत धुव्वा उडवला. सरफराजने 20 चेंडूंत 4 षटकार आणि 2 चौकार खेचत नाबाद 46 धावा ठोकल्या. तोच विजयाचा शिल्पकार ठरला.

दुर्गापूरच्या सुर्वोनिल रॉयचा कारनामा

सुर्वोनिल रॉयला आपल्या संघाला जेतेपद जिंकून देण्यात यश लाभले नाही. मात्र त्याने स्पर्धेत 50 धावांत 13 विकेट टिपण्याचा कारनामा करत मालिकावीरासाठी असलेल्या कारचे इनाम पटकावले. तसेच विजेत्या डिंग डाँग संघाला 1983 च्या प्रुडयेंशियल कपची प्रतिकृती असलेले सुप्रिमो चषक आणि 12 लाखांचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एवढेच नव्हे तर अंतिम सामन्यात खेळलेल्या डिंग डाँगच्या अकरा खेळाडूंना ज्युपिटर बाईक देण्यात आले.

सुप्रिमो चषकाच्या अंतिम सोहळ्याला हॉकी स्टार धनराज पिल्ले, हिंदुस्थानी क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, आयोजक-आमदार संजय पोतनीस, आमदार हारुन खान, आमदार बाळा नर, माजी महापौर श्रद्धा जाधव, विख्यात क्युरेटर नदीम मेमन, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रशिक्षक प्रदीप सुंदरम आदी उपस्थित होते.

अन् कृष्णाला खांद्यावर उचलले

सुप्रिमोचे आजवरचे सर्वच्या सर्व 11 हंगाम खेळण्याचा पराक्रम डिंग डाँग आणि कृष्णा सातपुतेनेही केला. पण दोघांनाही जेतेपदाचे चुंबन कधी घेता आले नव्हते. 2011 आणि 2018 साली ते अंतिम फेरीतही पोहोचले, पण दोन्ही वेळेला त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र आज संदीप यादवच्या गोलंदाजीवर दुर्गापूरची फलंदाजी अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडली. त्याने 7 धावांत 5 विकेट घेत दुर्गापूरच्या डावाला 7 रिश्टर स्केलचा धक्का दिला. त्यामुळे दुर्गापूरचा संघ 8 षटकांत 9 बाद 39 धावाच करू शकला. येथेच डिंग डाँगने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर कृष्णा सातपुतेने 18 चेंडूंत 27 धावांची सुप्रिमो विनिंग खेळी केली आणि आपले गेल्या दशकभराचे स्वप्न साकार केले. विजयी धाव घेताच हजारो चाहत्यांनीही मैदानात धाव घेतली आणि कृष्णाला खांद्यावर उचलून जेतेपदाचा जल्लोष साजरा केला. 

अंतिम दिवस ः सुप्रिमो विक्रम

n कृष्णा सातपुतेच्या सुप्रिमो चषकाच्या कारकिर्दीतील 350 धावा पूर्ण. अशी कामगिरी करणारा तो पहिलावहिला फलंदाज.
n डिंग डाँग संघाच्या संदीप यादवने 7 धावांत 5 विकेट टिपले. एका डावात पाच विकेट टिपणारा संदीप सातवा गोलंदाज ठरला. n डिंग डाँगचा कर्णधार योगेश पेणकरच्या 200 धावा पूर्ण. अशी कामगिरी करणारा बारावा फलंदाज. n मालिकावीर ठरलेल्या सव्रोनील रॉयने या स्पर्धेत 13 विकेट टिपत एका सुप्रिमो चषकामध्ये सर्वाधिक विकेट टिपण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. n दुर्गापूर संघाच्या मुन्ना शेख व सरफराज खान या सलामीवीरांनी 61 धावांचे विजय लक्ष्य बिनबादच गाठले. विजयी लक्ष्य एकही विकेट न बाद करता गाठण्याची ही पाचवीच वेळ आहे. n सुप्रिमो चषकाच्या 11 पर्वात एकूण 19082 धावांचा टप्पा पूर्ण, एकूण 1836 विकेट. n सुप्रीमो चषकाच्या इतिहासात 300 खेळाडू धावबाद.

मुंगी शिरायलाही जागा नाही

आज सुप्रिमो चषकाच्या अंतिम सामन्याने गर्दीचे सारे उच्चांक मोडले. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप असा लौकिक असलेल्या सुप्रिमो चषकाच्या डिंग डाँग आणि दुर्गापूर यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी टेनिस क्रिकेटप्रेमींनी कलिनाच्या एअर इंडिया मैदानाच्या दिशेने पावले वळवली होती. सायंकाळी सातच्या ठोक्यालाच एअर इंडियाच्या मैदानात मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे कलिना परिसरात हजारोंच्या संख्येने चाहते बाईकवर पोहोचल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रफिक पोलीस आणि सुप्रिमोच्या स्वयंसेवकांना तारेवरची कसरत करावी लागली. चाहत्यांची गर्दी थांबता थांबत नसल्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी पोलीसांना स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले.

आंतर विधानसभा सुप्रिमो चषक स्पर्धेचे विजेते यशवंत नगर क्रिकेट क्लब

सुप्रिमो चषकाच्या अंतिम सोहळ्यात शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या 11 वर्षांपासून चालू असलेली ही स्पर्धा आज इतक्या भव्य स्वरूपात पार पडते, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना मोठय़ा व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळते,’ असे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी काढले.

  सुप्रिमो चषक विजेते

n 2010    स्टार क्रिकेट क्लब (प्रभादेवी)

n 2011    राजेंद्र इलेव्हन (सांताक्रुझ)

n 2012    विनर स्पोर्टस् (नालासोपारा)

n 2013    वेदांत वाडा

n 2015    विजयदुर्ग स्पोर्टस् (मुंबई)

n 2016    मराठा पंजाब विनर स्पोर्टस् (भिवंडी)

n 2017    ट्रायडंट उमर इलेव्हन (नवी मुंबई)

n 2018    विनर स्पोर्टस् मराठा पंजाब (भिवंडी)

n 2022    उमर इलेव्हन ट्रायडंट (नवी मुंबई)

n 2023    शौर्य हर्षित (ठाणे)

n 2025    डिंग डाँग रेड डेविल्स अमर साई (पुणे)

सर्व आकडेवारी संजय म्हात्रे