टेनिस क्रिकेटचा धोनी; सहाव्यांदा सुप्रिमो चषक जिंकण्याचा सुमित ढेकळेचा निर्धार

टेनिस क्रिकेटचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो टेनिस क्रिकेट स्पर्धेत देशभरातून अनेक तगडे खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. या खेळाडूंमध्ये सुमित ढेकळे याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल पाच वेळा सुप्रिमो चषक विजेता राहिलेल्या सुमितने यंदा सहाव्या विजयानिमित्त पुन्हा मैदानात दमदार हजेरी लावली आहे.

सुमित ढेकळे केवळ एक उत्कृष्ट फलंदाज किंवा यष्टीरक्षकच नाही, तर संघाचा प्रेरणादायी कर्णधार म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या अचूक निर्णयक्षमतेमुळे आणि संयमित नेतृत्वामुळे त्याला ‘टेनिस बॉल क्रिकेटमधील धोनी’ अशी उपाधीही मिळाली आहे. सध्या तो बालाजी क्लब, मुंबई या संघाचे नेतृत्व करत असून दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये त्याच्या संघाने सिंधुदुर्ग आणि कोलकाता या संघांवर विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सुमित सध्या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी असून अव्वल स्थानापासून केवळ एक धावेच्या अंतरावर आहे. त्याची खेळी आणि नेतृत्व यामुळेच बालाजी क्लब पुन्हा एकदा विजेतेपदासाठी दावेदार ठरत आहे.

n सुमित ढेकळेचा क्रिकेट प्रवासदेखील तितकाच उल्लेखनीय आहे. त्याने पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत क्रिकेट खेळला असून टी-20 मुंबई लीगमध्ये उत्तर मुंबई पँथर्स संघात सहभागी होता. 2019 मध्ये पँथर्सने जेतेपद पटकावले होते तेव्हाही तो या विजयी संघाचा भाग होता. तसेच प्रवीण तांबे, स्वप्नील साळवी, विक्रांत औटी, साईराज पाटील यांसारख्या खेळाडूंशी त्याने मैदानात सहकाऱ्याप्रमाणे कामगिरी बजावली आहे. सुमित ढेकळे यंदा सहाव्यांदा सुप्रिमो चषक जिंकून एक नवा इतिहास रचतो का? त्याच्या नेतृत्वात खेळणारा बालाजी क्लब यंदा सर्वोच्च शिखर गाठतो का? याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आजच्या सुप्रिमो लढती

7 वा.   हॅरी रिबडा (राजकोट) विरुद्ध दुर्गापूर फ्रेंड्स क्लब

9 वा.   कंधारी पिंग्ज (मुंबई) विरुद्ध सचिन धावले इलेव्हन (पुणे)

11 वा. उभय सामन्यातील विजयी संघात लढत

सुप्रिमो चषकातून क्रिकेटला उद्याचे धडाकेबाज हिरे सापडत असल्यामुळे मुंबई क्रिकेटचे दिग्गज क्रिकेटपटूंनी या स्पर्धेला आवर्जून आपली उपस्थिती लावली. यात कसोटीपटू वसीम जाफरसह नीलेश कुलकर्णी, अविष्कार साळवी, सुरू नायक, संजय पाटील, शम्स मुलानी, ओमकार साळवी, अमित दाणी, अतुल रानडे या मुंबईकर क्रिकेट दिग्गजांचा समावेश होता.