
‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पुण्याच्या डिंग डाँग अर्थात रेड डेव्हिल्स संघाने पालघरच्या ताई पॅकर्सचा 8 विकेटने पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. डिंग डाँग संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा राजेश सोरटे सामनावीर ठरला.
सांताक्रुझ येथील एअर इंडियाच्या मैदानावर बुधवारपासून सुप्रिमो चषकाला सुरुवात झाली आहे. विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे यंदाचे हे 11 वे वर्ष आहे. उपउपांत्य सामन्यात पालघरच्या ताई पॅकर्सने 8 षटकांत 8 बाद 54 धावा केल्या. ताई पॅकर्सतर्फे करणने 23 चेंडूंत 31 धावा करीत एकाकी झुंज दिली. रेड डेव्हिल्स ऊर्फ डिंग डाँग संघातर्फे राजेश सोरटेने अचूक गोलंदाजी करीत 6 धावांत 3 विकेट घेतल्या. डिंग डाँग संघाने 8 विकेट राखून 5.3 षटकातच 55 धावा करीत ताई पॅकर्सचा दणदणीत पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक दिली. दरम्यान, ताई पॅकर्सने पहिल्या फेरीत राजकोटच्या एल. के. स्टारचा 24 धावांनी पराभव केला, तर डिंग डाँग संघाने मुंबईच्या यू. एस. इलेव्हनचा 6 विकेट राखून पराभव केला होता.
कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजकोट, केरळसह देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटू तर या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पण यंदा कर्नाटकच्या एफ. एम. हॉसपेट संघातून श्रीलंकेचे क्रिकेटपटूही आपल्या क्रिकेटचा जलवा दाखविणार आहेत.
सुप्रिमो चषकाचे 11 सीजन खेळणारे ओमकार देसाई, क्रिष्णा सातपुते आणि प्रीतम परब या खेळाडूंचा आयोजकांकडून ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डिंग डाँग संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा राजेश सोरटे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला आहे.
आजच्या सुप्रिमो लढती
- 7 वा. सुलतान ब्रदर्स पायराईट्स (केरळ) विरुद्ध रायगड ट्रायडेंट (रायगड)
- 9 वा. एफ. एम. हॉसपेट (कर्नाटक) विरुद्ध शांतीरत्न (डोंबिवली)
- 11 वा. उभय सामन्यातील विजयी संघ
देशातील सर्वाधिक रकमेची बक्षीस स्पर्धा अशी सुप्रिमो चषकाची ओळख आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला बाईक मिळणार असून संघाला 12 लाख रुपये मिळणार आहेत. या नॉक आऊट क्रिकेट स्पर्धेसाठी 70 हून अधिक संघांनी नोंदणी केली असून त्यामधून अंतिम 16 संघांची निवड स्पर्धेतील सहभागासाठी केली गेली आहे.