राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्ह नेमके कोणाचे? याबाबत सर्वोच्च न्यायालय आता पुढील वर्षांतच निर्णय देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी वेळेअभावी सुनावणी झाली नाही. याप्रकरणी आता 7 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रात सत्तेत स्थान मिळवण्यासाठी अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली आणि सत्तेत स्थान मिळवले होते. नंतर निवडणूक आयोगाने बंडखोरीच्या अनुषंगाने निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ पक्षचिन्ह आणि नाव वापरण्यास मुभा दिली होती. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर मागील दहा महिने ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. मंगळवारीही सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती उज्जाल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. हे प्रकरण याचवर्षी निकाली निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र सुनावणी लांबणीवर पडल्याने निकालासाठी नवीन वर्षाचीच वाट पाहावी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे.