
पुणे जिल्ह्यात नेहमीच ‘की पोस्ट’ राहिलेल्या खेड तहसीलदार नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. आता या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सध्या कार्यरत तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द ठरवून सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांना खेड तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
तहसीलदार ज्योती देवरे यांची याचिका फेटाळली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) आणि उच्च न्यायालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती आधीच रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. देवरे यांच्या जागेवर तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीवेळी याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही, असे नमूद करत याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार ज्योती देवरे या तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जवळच्या मानल्या जात होत्या.
प्रशांत बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मास्क घातला नाही, हे कारण हास्यास्पद असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले होते. पण, आता कोर्टाने बेडसे यांना दिलासा देत त्यांचे निलंबन रद्द केले. यानंतर आता मॅटनंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांची खेडच्या तहसीलदारपदी पुन्हा नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.