
महिलेच्या पायजम्याचा नाडा सोडणे किंवा तिच्या स्तनांना स्पर्श करणे म्हणजे काही बलात्कार होत नाही हा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे असंवेदनशील आणि अमानवी दृष्टिकोन दर्शवतो असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच या निकालाला स्थगिती दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र, उत्तर प्रदेश सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची स्वतःहून दखल घेत त्यावर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. यावर आज सुनावणी झाली. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांनी नमूद केले. उच्च न्यायालयाच्या निकालातील परिच्छेद 21, 24 आणि 26 हे पूर्णपणे अमानवी आणि असंवेदनशील दृष्टिकोन दर्शवतात, असे न्यायमूर्तींनी नमूद केले.
उच्च न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक
निकाल आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे न्यायमूर्ती म्हणाले. हा निकाल असंवेदनशील आणि अमानवी असून आम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबद्दल असे कठोर शब्द वापरताना आणि हा निकाल चुकीचा आहे हे सांगताना आम्हाला खेद वाटतो, असे न्यायमूर्ती गवई म्हणाले. निकाल राखीव ठेवल्यानंतर चार महिन्यांनी उच्च न्यायालयाने निकाल दिला. यावरून न्यायालयाने विचारविनिमय करून निकाल दिला होता असे दिसते, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
नेमके काय प्रकरण…
दोन आरोपींनी एका 11 वर्षीय मुलीला घरी सोडण्याच्या नावाखाली बाईकवरून निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी तिच्या छातीला स्पर्श केला आणि तिच्या पायजम्याची नाडी सोडली तसेच तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने आरडाओरडा केल्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमली. त्यामुळे दोघांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.