पाचशेच्या नोटांची बंडलं, पाच गोण्या भरून पैसे ! न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आगीनंतरचा ‘व्हिडीओ’ जारी केला

15 कोटींच्या ‘कॅशकांड’मुळे रडारवर आलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी पाचशेच्या नोटांची बंडलं असलेल्या पाच गोण्या आढळल्या. अर्धवट स्थितीत जळालेल्या या नोटांच्या ढिगांचा व्हिडीओ आणि काही छायाचित्रे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संकेतस्थळावर शेअर केली आहेत. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचा चौकशी अहवालही जाहीर केला. रोकडशी संबंध नाकारणाऱया वर्मा यांचे पितळ यातून उघडे पडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच अशा प्रकारे दणका दिला आहे.

न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 14 मार्चला आग लागली. त्या आगीनंतर घरात तब्बल 15 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ती रक्कम आपली नसल्याचा दावा करुन वर्मा यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र दिल्ली पोलिसांनी शेअर केलेले घटनास्थळाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सर्वोच्च न्यायालयाने वेबसाईटवर जारी केल्याने वर्मा यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. पाचशेच्या नोटांची बंडले भरून चार ते पाच गोण्या वर्मा यांच्या घरी आढळल्याचे व्हिडीओतून उघडकीस आले आहे. सर्व नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसत आहेत. अग्निशमन दलाचा जवान अर्धवट जळालेल्या नोटा प्लॅस्टिकच्या बॅगेतून बाहेर काढत असल्याचे तसेच ‘महात्मा गांधी में आग लग गई’ असे म्हणताना ऐकू येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल आणि वर्मा यांचा जबाबदेखील न्यायालयाच्या वेबसाईटवर शेअर केला आहे. होळीच्या सायंकाळी लागलेल्या आगीने न्यायमूर्तींशी कनेक्शन असलेले ‘पॅशकांड’ उजेडात आल्याने सर्वोच्च न्यायालयापासून संसदेपर्यंत आणि रस्त्यापासून ते सोशल मीडियापर्यंत प्रचंड खळबळ उडाली आहे.

वर्मा यांनी आरोप फेटाळले

वर्मा यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांची सखोल चौकशी सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही न्यायमूर्तींची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे वर्मा यांचे कारनामे उघड होत असताना त्यांनी मात्र आरोपांचे खंडन केले आहे. स्टोअर रूममध्ये मी किंवा माझ्या कुटुंबीयांपैकी कोणीही रोख रक्कम ठेवलेली नाही. मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी सादर केलेला चौकशी अहवाल हे मला नाहक गोवण्याचे षड्यंत्र आहे. व्हिडीओतील नोटांच्या गोण्या पाहून मलाही धक्का बसला आहे, असे स्पष्ट करीत वर्मा यांनी आरोप फेटाळले आहेत.

काही दिवसांपूर्वीही आढळलेले नोटांचे तुकडे

वर्मा यांच्या घराजवळ स्वच्छता करणाऱया सफाई कर्मचारी इंद्रजीत यांना 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे तुकडे आढळले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीदेखील याच परिसरात नोटांचे तुकडे आढळले होते, असा जबाब इंद्रजीत यांनी दिला आहे. याच नोटा न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी जळत असतानाचा 60 सेकंदाचा अनकट व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

मोबाईल डेटा डिलीट करू नका!

वर्मा यांनी त्यांच्या फोनची विल्हेवाट लावू नये, मोबाईलमधील डाटा वा मेसेज डिलीट करू नयेत, असे आदेश सरन्यायाधीश खन्ना यांनी दिले आहेत. वर्मा यांच्या घरात 15 कोटी आले कोठून याबाबत सखोल जबाब नोंदवा तसेच 15 मार्चला जळालेल्या नोटा बाहेर काढणाऱ्या व्यक्तीची बाजू ऐका, अशा सूचना सरन्यायाधीशांनी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांना दिल्या आहेत.