Mahakumbh Stampede महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) मौनी अमावस्येच्या पहाटे चेंगराचेंगरी होऊन 49 भाविकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तरप्रदेश मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

”ही घटना जरी दुर्दैवी व चिंता वाढवणारी असली तरी यासाठी एक न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्यांची याचिका पहिला अलाहाबाद न्यायालयात दाखल करावी, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

विशाल तिवारी या वकिलाने सदर दुर्घटनेबाबच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांनी फेटाळून लावली आहे.

महाकुंभातील चेंगराचेंगरीची चौकशी करण्य़ासाठी माजी न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. माजी पोलीस अधिकारी वि के गुप्ता व निवृत्त अधिकारी डी.के.सिंग हे या समितीत आहेत.