नीट युजी पेपर फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खाजगी कोचिंग सेंटरला चांगलेच फटकारले आहे. तुम्हाला या प्रकरणात लुडबूड करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने कोचिंग सेंटरला ठणकावले आहे. तसेच कोचिंग सेंटरचा कोणता मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेला, ज्यामुळे कलम 32 अंतर्गत याचिका दाखल केली, असा सवालही न्यायालयाने कोचिंग सेंटरला केला आहे. कोचिंग सेंटरतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. NTA ने OMR च्या मूल्यमापनाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा तयार केलेली नाही, असे याचिकेत म्हटले होते. यावर भाष्य करताना न्यायालयाने कोचिंग सेंटरचा समाचार घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने नीट युजी परीक्षा घोटाळ्याची गंभीर दखल घेत एनटीएला नोटीस बजावली आहे. ‘गुणांमधील विसंगती’बाबत 8 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला दिले आहेत. मात्र, याप्रकरणात कोचिंग सेंटरने उडी घेतल्याने न्यायालयाने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.
या प्रकरणी कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांना चिथावणी देत आपल्यामागे गर्दी गोळा करतेय, याकडे आमचे लक्ष आहे. मात्र कोचिंग सेंटरचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. क्लास झाले की तुमचे काम संपते, अशा कठोर शब्दात न्यायालयाने कोचिंग सेंटरचा समाचार घेतला आहे.