बुलडोझर कारवाईवेळी चिमुरडी हातात पुस्तकं घेऊन धावली, सर्वोच्च न्यायालयानेही घेतली दखल

उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवले जात असताना एक चिमुरडी हातात पुस्तकं घेऊन धावल्याचा व्हिडीओ अलीकडे व्हायरल झाला. देशभरात हा व्हिडीओ आणि ही मुलगी चर्चेत आली. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही तिची दखल घेतली. व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये 21 मार्च रोजी करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यानचा आहे. कारवाई सुरू असताना एक चिमुकली अचानक एका झोपडीत गेली आणि तिथून हातात पुस्तकांचा गठ्ठा असलेलं दप्तर घेऊन बाहेर पळत आली. व्हिडीओत पळणाऱया आठ वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे अनन्या यादव. तिच्या शाळेच्या दप्तरात हिंदी, इंग्रजी आणि गणिताची पुस्तकं होती. उत्तर प्रदेश सरकारकडून राबलल्या जाणाऱया बुलडोझर कारवाईवर मंगळवारी ताशेरे ओढताना सर्वोच्च न्यायालयाने या व्हिडीओचीही दखल घेतली.

काय म्हणाली अनन्या…

लहानगी अनन्या यादव म्हणाली, ‘मी त्या दिवशी शाळेतून परत आले आणि झोपडीत दप्तर ठेवलं. झोपडीच्याच बाजूला माझ्या आईने गुरांना बांधलं होतं. त्यांनी कारवाई सुरू केली आणि आमच्या बाजूच्या झोपडीत आग लागली. मी लगेच धावत गेले. मला वाटलं माझं शाळेचं दप्तर आणि पुस्तकांनाही आग लागली. माझ्या आईनं मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी थांबले नाही. पुस्तकं घेऊन मी परत आईजवळ गेले. पुस्तकं जळाली असती तर शाळेतून नवीन मिळाली नसती.’