नात्यात कटुता आल्यानंतर बलात्काराची तक्रार नोंदवणं चिंताजनक ट्रेण्ड, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सहमतीने झालेल्या नात्यात कटुता आल्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल करण्याचा ट्रेण्ड आला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. शिवाय न्यायालयाने म्हटले आहे की, महिला जोडीदाराकडून लग्नाची मागणी किंवा विरोध न करता जोडप्यांमधील दीर्घकाळ शारीरिक संबंध हे फसवणूक नसून ‘सहमतीचे नाते’ दर्शवते.

न्यायमूर्ती बी.वी नागरत्ना आणि एन कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यात एका महिलेने ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाविरोधात बलात्काराचा दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. बार अॅण्ड बेंचच्या वृत्तानुसार न्यायालयाने सांगितले की, हा एक चिंताजनक ट्रेण्ड आहे. सहमतीने बनवलेल्या नातेसंबंधात कटुता आल्यानंतर त्यासाठी न्यायालयाचा आधार घेत गुन्हा बनविण्याचा प्रयत्न केला जातो, असे स्पष्ट केले.

पुढे खंडपीठाने सांगितले की, सहमतीने बनवलेले शारीरिक संबंध आणि लग्नाचे आमिष दाखवून बनवलेल्या संबंधामधील अंतर यावेळी स्पष्ट केले. न्यायालयाने सांगितले की, महिला जोडीदार लग्नाच्या आमिषाशिवाय अन्य कारणांसाठी पुरुषासोबत शारीरिक संबंध बनवू शकते, जसे की वैयक्तिक आकर्षणही म्हणता येईल.