संसारातील टोमणे दैनंदिन जीवनाचा भाग, सासूसासऱ्याविरोधातील गुन्हा रद्द

सासरी नांदणाऱ्या विवाहित महिलांना सासूसासऱ्यांचे टोमणे अनेकदा ऐकावे लागतात. या जाचामुळे वैतागून सासूसासऱ्यांविरोधात महिला तक्रार दाखल करतात. या तक्रारी प्रकरणी हायकोर्टात धाव घेणाऱ्या सासूसासऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला. संसारातील टोमणे दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सासूसासऱ्यांविरोधातील गुन्हा रद्द केला.

2005 साली गुजरातमधील एका दाम्पत्याचा विवाह झाला. त्यानंतर भांडण झाल्यावर त्याने घटस्प्पह्टासाठी अर्ज केला तर तीन दिवसांत महिलेने पती आणि सासूसासऱ्यांविरोधात काwटुंबिक छळाची तक्रार दाखल केली. आपल्याला पैशासाठी छळले जात असून सतत सासूसासरे टोमणे मारतात, असा दावा तिने करताच पोलिसांनी सासूसासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली, मात्र गुजरात न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

न्यायालय काय म्हणाले

लग्न झाल्यावर काही वर्षे झाल्यानंतर वैवाहिक वाद उफाळून येतात व परस्पर तक्रारी, खटले दाखल केले जातात. त्यामुळे न्यायालयांनी आरोपांमध्ये नेमके तथ्य किती आहे, हे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे काळजीपूर्वक विचारात घेतले पाहिजे. महिलेने सासरच्या लोकांनी टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मात्र त्या टोमण्यांबद्दल विशिष्ट तपशील दिलेला नाही, वास्तविक संसारात मारले जाणारे काही टोमणे हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे. कुटुंबाच्या सुखासाठी त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.