हुंड्याची अधिक मागणी करत तीन दिवसात लग्न मोडणाऱ्या एका व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. 19 वर्ष चाललेल्या या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पत्नीच्या बाजूने निकाल देत पतीला तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील चार आठवड्यांमध्ये रक्कम जमा न केल्यास या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सुद्धा सुप्रीने कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
सदर घटना 3 फेब्रुवारी 2006 रोजी घडली होती. सोनल (बदलेले नाव) आणि मंगेश (बदलेले नाव) यांचा विवाह ठरला होता. यासाठी सोनलच्या आई-वडिलांनी सोनलला 60 सोन्याची नाणी आणि मंगेशला 10 सोन्याची नाणी भेट स्वरुपात दिली होती. परंतु लालची मंगेशचे एवढ्यावरच समाधान झाले नाही. त्याने अधिक हुंड्याची मागणी केली, तसेच लग्न झाल्यानंतर अजून 30 सोन्याची नाणी देण्याची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या सोनलने मंगेशविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तामिळनाडूच्या सैदापेट ट्रायल कोर्टाने मंगेशला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा आणि 3,000 रुपये दंड ठोठावला होता.
त्यानंतर मंगेशने मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. मद्रास हायकोर्टानेही मंगेशला दोषी ठरवले, परंतु त्याची शिक्षा दोन वर्षांनी कमी केली. त्यानंतर त्याने मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या दरम्यान त्याने तीन महिने जेलमध्येही घालवले. अखेर सुप्रीम कोर्टाने निर्णय देत मंगेशला दोषी ठरवले असून सोनलला तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोनलने दुसरे लग्न केले असून ती पतीसोबत परदेशात रहायला आहे.