Supreme Court Of India YouTube Channel Hacked – सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक

सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक झाले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास चॅनेल हॅक झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. युट्यूबवर ‘सुप्रीम कोर्ट’ असे सर्च केल्यानंतर अमेरिकन कंपनी रिपलचे व्हिडीओ आणि चॅनेलवर क्रिप्टोकरन्सी एक्सआरपीच्या जाहिरातीही दिसत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. युट्यूब चॅनेलचा वापर प्रामुख्याने घटनात्मक खंडपीठांसमोर सुचीबद्ध केलेल्या खटल्यांची सुनावणी आणि सार्वजनिक हितांच्या प्रकरणांवरील थेट सुनावणीसाठी केला जातो. मात्र शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक झाल्याचे समोर आले. न्यायालयाची आयटी टीम चॅनेल पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असून यासाठी त्यांनी एनआयसीची मदत मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयात देशभरातील प्रमुख खटल्यांवर सुनावणी होते. या संदर्भातील कागदपत्रही सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. त्यामुळे हॅकरने युट्यूबप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य साईटवरही हल्ला चढवला तर मोठा गदारोळ उडू शकतो. अर्थात तसे घडण्याची शक्यता नसली तरी आयटी टीम अलर्ट झाली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल कुठून हॅक झाले याचा शोध सुरू आहे. या सायबर हल्ल्याची अद्याप कुणी जबाबदारी घेतलेली नाही. तपास यंत्रणा याचा कसून शोध घेतल असून तपासानंतरच हॅकर्स नक्की हिंदुस्थानातील आहे की बाहेरचा हे स्पष्ट होईल.

2018 ला वेबसाईट झालेली हॅक

याआधी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट हॅकर्सने हॅक केली होती. त्यावेळीही हॅकर्सने कुठे बसून सर्वोच्च न्यायालायची वेबसाईट हॅक केली हे स्पष्ट झाले नव्हते. आता युट्यूब चॅनेलही हॅक झाल्याने तपास पथकापुढे हॅकर्सचा शोध लावण्याचे मोठे आव्हान आहे.