NEET परीक्षा घोटाळ्याची SC कडून गंभीर दखल; ‘गुणांमधील विसंगती’वरून NTA ला बजावली नोटीस

संपूर्ण देशभरात वादंग उठलेल्या NEET परीक्षा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (NTA) नोटीस बजावली. 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्यामुळे परीक्षेचा घोळ निर्माण झाला होता. याचा मोठा फटका देशभरातील इतर विद्यार्थ्यांना बसला, याकडे लक्षवेधणाऱ्या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ‘झायलेम लर्निंग ‘ ॲपमार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 8 जुलैपर्यंत उत्तर सादर करा, असे निर्देश न्यायालयाने एनटीएला दिले आहेत.

वाढीव गुण, पेपरफुटी, लागोपाठ आसनक्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण या गोष्टींमुळे नीट परीक्षेतील घोटाळा चव्हाट्यावर आला होता. याचा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर झायलेम लर्निंग ॲपमार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नीट युजी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा दावा केला. याचिकेतील विविध आरोपांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि संबंधित आरोपांच्या अनुषंगाने एनटीएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रपतींकडूनही नीट घोटाळ्याची दखल

संसदेत अभिभाषणावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पेपर लीकच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “कोणत्याही कारणामुळे परीक्षांमध्ये अडथळा येत असेल तर ते योग्य नाही. सरकारी भरती आणि परीक्षांमध्ये पवित्रता आणि पारदर्शकता आवश्यक आहे. पेपर लीकच्या अलीकडील घटनांमध्ये निष्पक्ष तपास करण्यासाठी आणि दोषींना सर्वात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे”, असे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले.