बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला धार्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. शिक्षेत दिलासा मिळावा यासाठी आसाराम बापूने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली. याआधी त्याने सूरतमधील कनिष्ठ न्यायालयात आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
ज्येष्ठ वकील दामा शेषाद्री नायडू यांनी आसाराम बापू याची न्यायालयात बाजू मांडली. आसाराम बापू अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचे नायडू यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची तब्येत बिल्कुल ठीक नाही. अशा परिस्थितीत त्याची तुरुंगातून अंतरिम सुटका करण्यात यावी. वृद्धापकाळ आणि आजारांमुळे त्याला चालता येत नाही. हिवाळ्यात त्याला त्याच्या सोयीनुसार तापमान नियंत्रित करता येईल अशा खोलीत ठेवण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे, असे नायडू यांनी आपली बाजू मांडताना सांगितले.
यावर न्यायालयाने टिप्पणी करत, यापूर्वी तुमच्या आवडीचे रुग्णालय न मिळाल्याने तुम्ही आसारामवर उपचार करून घेतले नाही आणि नकार दिल्याचे म्हटले आहे. याला उत्तर देताना आम्ही त्याच्यावर बायपास किंवा ॲलोपॅथी उपचार करू शकत नाही, त्याचे उपचार आयुर्वेदातूनच करावे लागतील, असे वकिलाने सांगितले. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला तीन आठवड्यांत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.