‘घड्याळा’चा फैसला नवीन वर्षात होणार, सुप्रीम कोर्टातील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत लांबणीवर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी द्विसदस्यीय खंडपीठापुढे सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व ‘घड्याळ’ चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले, असा दावा करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी लक्षवेधी ठरणार आहे.