न्यायालयातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 104 वर्षाच्या आरोपीला अंतरिम जामीनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. तो 104 वा वाढदिवस आपल्या कुटुंबासह साजरा करू शकेल आणि त्याच्या आयुष्यातील शेवटचे दिवस शांततेत घालवू शकेल यासाठी त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे.
मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एका खेडेगावातील रसिक चंद्र मंडल या वृद्धाचा अर्ज आला त्यावेळी न्यायालयानेही औदार्य दाखवले. कारण मंडल यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्याच्या समस्यांमुळे तुरुंगातून सुधारगृहात हलवण्यात आले होते. रसिक मंडल याला 1988 मध्ये झालेल्या एका हत्याकांडात दोषी ठरवत 1994 मध्ये ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मंडलने कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केले. त्यानंतर 2018 मध्ये, उच्च न्यायालयाने मंडलचा अर्ज फेटाळला आणि ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवला. जानेवारी 2019 पासून तुरुंगात असलेल्या मंडलने त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, मात्र 11 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळला.
मंडल यांनी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नवीन अपील दाखल केले ज्यामध्ये त्यांनी त्यांचे 99 वर्षांचे वय आणि आजारपणाचे कारण देत मुदतपूर्व सुटकेची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आणि 2021 मध्ये तो गांभीर्याने घेतला. आता मंडल याने आपल्या 45 वर्षीय मुलाकडून अर्ज दाखल करुन वयाच्या 104 व्या वर्षांच्या त्याच्या वडिलांची सुटका करावी अशी मागणी केली. मुलाच्या वतीने अर्ज केला असता, न्यायालयाने मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे दाखल झालेल्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मंडलला अंतरिम जामीन मंजूर करुन सोडण्याचे आदेश दिले.