गेल्या 33 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. डल्लेवाल यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे. त्यांचे उपोषण आणि प्रकृतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू आहे. यातच शनिवारी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पंजाब सरकारला फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने डल्लेवाल यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या विशेष खंडपीठाने शेतकरी नेते डल्लेवाल यांना रुग्णालयात नेण्यासाठी पंजाब सरकारला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, शेतमालाला किमान आधारभूत किंमतच्या (MSP) कायदेशीर हमीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून पंजाब येथील खनौरी सीमेवर आमरण उपोषण करत आहेत.