
घटस्फोट घेऊन वेगळे होणार्या दाम्पत्यांना सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लग्न अपयशी ठरले, संसार करण्यात अपयश आले म्हणजे आयुष्याचा शेवट झाला असे म्हणता येणार नाही, दाम्पत्याने अलिप्त होताना भविष्याचा विचार करावा, असे महत्वपूर्ण मत न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले. न्यायालयाने या प्रकरणात दाम्पत्याला घटस्फोट मंजूर केला.
न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील दाम्पत्याचा मे 2020 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर दाम्पत्यामध्ये खटके उडू लागले. त्यात दोघांनी एकमेकांविरुद्ध 17 गुन्हे दाखल केले होते. ते सर्व गुन्हे न्यायालयाने रद्द केले आणि दोघांना यापुढे भविष्याचा विचार करून वाटचाल करण्यास सांगितले. संसार अर्ध्यावर मोडला म्हणजे आयुष्याचा शेवट झाला नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
सासरच्यांकडून होत असलेल्या अमानुष छळामुळे लग्नानंतर एक वर्षाच्या आतच विवाहितेला घर सोडण्यास भाग पडावे लागले. हे दुर्दैवी प्रकरणांपैकी एक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हा खटला वर्षानुवर्षे चालू शकतो, त्यामुळे या खटल्यात लढणे निरर्थक ठरेल, असा सल्लाही न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या वकिलांना दिला.