सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. येथे दररोज हजारो खटले येतात. राजकीय असो वा इतर अनेक मोठी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतात. या खटल्यांच्या सुनावणीवेळी वकील न्यायमूर्तींसमोर आरडाओरडा करतात आणि मोठ्या आवाजात आपली बाजू मांडतात, हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि भावी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आरडाओरडा सुरू केला. यावर बीआर गवई यांनी नाराजी व्यक्त करत वकिलांना चांगलेच फटकारले. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.
न्यायमूर्ती बीआर गवई म्हणाले की, मी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि छत्रपती संभाजीगर खंडपीठात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयासारखे शिस्तीचा अभाव असणारे न्यायालय पाहिले नाही. येथे एका बाजूला सहा आणि दुसऱ्या बाजूला सहा वकील एकमेकांवर ओरडत असतात. उच्च न्यायालयातही असा प्रकार झाल्याचे कधी ऐकले नाही. त्यामुळे सर्व वकिलांनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आदर करावा.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही न्यायमूर्ती बीआर गवई यांनी अशीच टिप्पणी केली होती. आमच्यापैकी जे लोक उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात येतात त्यांना येथे शिस्तीचा अभाव जाणवतो. येथे कुणीही कधीही बोलू शकतो. व्यवस्थेचा अभाव यात स्पष्ट प्रतित होतो, असे ते म्हणाले होते.
डॉ. चंद्रचूड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची 382 पानी तक्रार; लोकपालांचा सुनावणीस नकार
भावी सरन्यायाधीश
न्यायमूर्ती बीआर गवई भावी सरन्यायाधीश आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई सरन्यायाधीश होतील. संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे, 2025 ला संपणार आहे.