संमतीने लैंगिक संबंधांनंतर बलात्काराचे गुन्हे चिंताजनक, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याचा वाढत चाललेला ट्रेंड अत्यंत चिंताजनक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालाने नोंदवले. महिला जोडीदाराने विरोध न करता किंवा लग्नासाठी आग्रह न धरता दीर्घकाळापर्यंत लैंगिक संबंध ठेवणे हे संमतीने निर्माण झाल्याच्या नात्याचे संकेत आहेत याकडेही सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले.

या प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ता आहे. आरोपीने तक्रारदार महिलेच्या मोठय़ा मुलीचे अपहरण झाले तेव्हा तिच्या सुटकेसाठी मदत केली होती. यानंतर तक्रारदार महिला सातत्याने आरोपीच्या कार्यालयात जाऊ लागली आणि त्याला त्याच्या कामात मदत करू लागली. यासाठी आरोपी तक्रारदार महिलेला आर्थिक मदतही करायचा. मात्र तक्रारदार महिलेची आर्थिक मदतीची मागणी वाढल्यामुळे आरोपीने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलेने आरोपी तसेच त्याच्या कुटुंबीयांना धमकवायला सुरुवात केली. यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतरही या महिलेने आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीने केला आहे.