Ranveer Allahbadia प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; अटींसह पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची दिली परवानगी

supreme-court-allows-ranveer-allahabadia-resume-show (1)

YouTuber रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahbadia) सोमवारी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडून सोशल मीडियावर त्याचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मागितली. रणवीरने त्याच्या याचिकेत न्यायालयाला सांगितलं की, हा त्याचा उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग आहे. यावर सुनावणी करताना आता सर्वोच्च न्यायालयानं रणवीरला दिलासा दिला आहे.

रणवीर कडून लिखित स्वरुपात वचन मागितलं आहे की त्याचे स्वतःचे शो सभ्यता आणि नैतिकतेचे मानक राखतील, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक ते पॉडकास्ट पाहू शकतील. त्यानंतर न्यायालयाने त्याला ‘द रणवीर शो’ हा शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

पॉडकास्टर रणवीरने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या अत्यंत घाणेरड्या आणि बेताल वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. या वक्तव्यामुळे अलाहबादियाविरुद्ध अनेक एफआयआर दाखल झाले. महाराष्ट्र सायबर आणि मुंबई पोलीस विनोदी कलाकार समय रैनाच्या शोमध्ये रणवीरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करत आहेत.

सोमवारी, अलाहबादिया आणि आशिष चंचलानी महाराष्ट्र सायबरसमोर स्वतंत्रपणे हजर झाले आणि त्यांनी त्यांच्या आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या अश्लीलतेच्या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवले, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. चौकशी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात, अलाहबादियाने कबूल केले की त्यांनी यूट्यूब शोमध्ये वादग्रस्त विधान करून चूक केली. वादग्रस्त विधानामुळे त्याच्यावर जबरदस्त टीका होत असल्याचंही तो म्हणाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरून स्पष्ट करण्यात आले आहे.