सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव बाबा आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना दणका दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. पण न्यायालयाने त्याचा माफीनामा फेटाळला आहे. ‘या प्रकरणात आम्ही उदारता दाखवणार नाही. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने दाखल केलेले उत्तरही समाधानकारक नाही. माफी कागदावर मागितली आहे. यामुळे आम्ही ती फेटाळून लावतोय. जाणूनबुजून उल्लंघन केले आहे. यामुळे परिणामांसाठी तयार राहा’, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्लाह यांच्या पीठाने फटकारले आहे. ‘आम्ही आंधळे नाही. सगळं दिसतंय’, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणी आता 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
न्यायालयाला दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन करून दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींचे प्रकाशन केल्याने रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमाननेचा खटला सुरू आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. ‘प्रकरण न्यायालयात येत नाही तोपर्यंत अवमान करणाऱ्यांनी माफीनामा पाठवला नाही. त्यांनी तो आधी मीडियाला दिला. रात्री साडेसात वाजेपर्यंत तो आमच्याकडे अपलोड झालेला नव्हता. ते प्रचारावर विश्वास ठेवतात, हे स्पष्ट आहे’, असे म्हणत न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी पतंजलीच्या संस्थापकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. ‘या प्रकरणी त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे’, असे रोहतगी यांनी सांगितले.
‘या प्रकरणात परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवमानना करणाऱ्यांशी हातमिळवणी केली होती. आता संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी कंपनीला इशारा देऊन सोडून दिले होते. पण 1954 च्या कायद्यानुसार इशारा देण्याची आणि गुन्हा कमी करण्याची कुठलीही तरतूद नाहीये. यातून एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाची खिल्ली उडवली गेली. तुम्ही कायदेशीर सल्ला घेतला होता का? हे लज्जास्पद आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने नमूद केले. ‘तुम्ही लोकांच्या जिवाशी खेळत आहात. जेव्हा लोक ही औषधे घेत होते आणि त्यांना फसवले जात होते तेव्हा तुम्ही काय केले?’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या प्रशासनाला केला.