रेल कामगार सेनेचा नॅशनल रेल्वे युनियनला पाठिंबा! कोकण रेल्वे मान्यताप्राप्त संघटना निवडणूक

कोकण रेल्वेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत रेल्वे एम्प्लॉईज युनियनने गद्दारी करीत शिवसेनेसोबत केलेला ‘एमओयू’ न मानता रेल कामगार सेनेच्या निशाणीवर लढण्यासही नकार दिल्याने आता रेल कामगार सेनेने नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयासंबंधी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनने गद्दारी करून रेल कामगार सेनेच्या निशाणीवर लढण्यास नकार दिला. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढून भगव्याशी गद्दारी करणाऱ्या, विश्वासघातकी संघटनेस पाठिंबा न देता नॅशनल रेल्वे मजदूर युनियन संघटनेस पाठिंबा द्या अशा प्रकारचे निर्देश रेल कामगार सेना अध्यक्ष विनायक राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दिले आहेत. या आदेशाचे तंतोतंत पालन करून ‘बत्ती’ या निशाणीवर भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहन सरचिटणीस दिवाकर देव यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. यावेळी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई, आदेश बांदेकर आणि रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, कोकण रेल्वे रेल कामगार सेना सरचिटणीस राजू सुरती उपस्थित होते.