पाईपलाईनला धक्का; दादर, शीव, माटुंग्यातील घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत

खोदकाम करताना महानगर गॅस लिमिटेडच्या पाईपलाईनला धक्का लागल्याने घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी घडली. याचा फटका शीव, दादर, वडाळा, माटुंगा, प्रतीक्षा नगर, अॅण्टॉप हिल या भागातील घरगुती ग्राहकांना बसला. सोमवारी इतर एजन्सीकडून रस्त्याचे खोदकाम सुरू असताना महानगर गॅसच्या पाईपलाईनला धक्का बसून सेवा विस्कळीत झाली. परिणामी या परिसरातील हजारो ग्राहकांचे हाल झाले. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शीव येथील व्हीव्हीएफ पंपनीजवळील रतन बिल्डिंग येथे पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, उद्या, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होईल, असे महानगर गॅसच्या वतीने कळविण्यात आले आहे.