
एकीकडे राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात असताना दुसरीकडे ठाण्यात सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे 1 हजार 500 कामगारांना गेली दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने मासिक वेतन दिलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले.
ठाण्यातील तीनहात नाका येथे 1949 पासून सुपरमॅक्स (विद्युत मेटालिक्स) ही ब्लेड उत्पादन करणारी कंपनी आहे. मूळ मल्होत्रा यांच्या मालकीची ही कंपनी सध्या लंडन येथील ऍक्टिस ही संस्था चालवते. या कंपनीत दीड हजार कामगार काम करतात.
कोविड काळापासून कंपनी तोट्यात चालत असल्याने नोव्हेंबर 2022 पासून कंपनीतील सर्व ऑपरेशन्स ठप्प झाली आणि डिसेंबर 2022 पासून टाळेबंदी करण्यात आली. तेव्हापासून हजारो कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. वारंवार निवेदनं देऊन आणि निदर्शने, आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने रविवारी हे कामगार थेट एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर ठिय्या मांडून बसले.