
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची फलंदाजी सुरुवातीला अडखळली. मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर शेख रशीदला (0) बाद करत चेन्नईला धक्का दिला. आयुष माथरे (30 धावा, 19 चेंडू) आणि डेवाल्ड ब्रेविस (42 धावा, 25 चेंडू) यांनी काही काळ संघाला सावरले, पण नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. कमिंदु मेंडिसने रविंद्र जडेजाला (10) बाद करत चेन्नईला आणखी दबावाखाली आणले, तर हरशल पटेलने डेवाल्ड ब्रेविसला बाद करण्यासाठी मेंडिसच्या झेलेची साथ मिळाली.
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, जो आपला 400 वा टी-20 सामना खेळत होता, यावेळी फारशी कमाल दाखवू शकला नाही. हरशल पटेलने त्याला 5 धावांवर बाद केले. शेवटी दीपक हुड्डा (20 धावा) याने काही धावा केल्या, पण चेन्नई 19.5 षटकांत 154 धावांवर सर्वबाद झाले. हैद्राबादसाठी हरशल पटेलने 4/28 ची शानदार गोलंदाजी केली, तर पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. कमिंदु मेंडिस आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. खलील अहमदने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला (0) बाद केले. तर ट्रॅव्हिस हेड 16 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेन्रिक क्लासेनही 7 धावांवर माघारी परतला. ज्यामुळे हैदराबादने 54 धावांवर 3 मोठे बळी गमावले. ईशान किशन (44) आणि अनिकेत वर्मा (19) यांनी 36 धावांची भागीदारी केली. नंतर कमिंदू मेंडिस (32*, 22 चेंडू) आणि नितीश कुमार रेड्डी (नाबाद) यांनी 49 धावांची नाबाद भागीदारी करत हैदराबादला विजय मिळवून दिला.