भाजपप्रणीत छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजने’चा लाभ चक्क सनी लिओनी घेत होती अशी माहिती समोर आली आहे. या योजनेची लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर पैसे पाठवण्यात आल्याचे उघड झाले असून या संपूर्ण प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कथितरीत्या छत्तीसगड येथे सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडण्यात आले होते. या खात्यात विवाहित महिलांना ‘महतरी वंदन’ या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे एक हजार रुपये पाठवले जात होते.
राज्यातील सत्ताधारी भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या जाहिरनाम्यात या योजनेची घोषणा केली होती. या सर्व प्रकाराची आता बस्तर जिल्हा प्रशासन चौकशी करत आहे. ‘महतरी वंदन’ योजनेच्या संकेतस्थळावर चाचपणी केली असता संबंधीत फाइलमध्ये लाभार्थी म्हणून सनी लिओनी आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे.