सुनीताला ओव्हरटाइमचे पैसे मिळणार; अंतराळातील नऊ महिन्यांचा नासा हिशेब करणार

नासामधील हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे नऊ महिन्यांनंतर  इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर परतणार आहेत. तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे येणे खूप लांबले. ते आता 19 मार्च रोजी परत येणार आहेत. अशातच त्यांना एवढय़ा दीर्घकाळासाठी अंतराळात राहण्याचे नासाकडून किती पैसे मिळणार, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबद्दल नासाचे निवृत्त अंतराळवीर कॅडी कोलमन यांनी सांगितले की, अंतराळवीरांना ओव्हरटाईमसाठी कोणताही विशेष पगार दिला जात नाही. फेडरल कर्मचारी असल्याने त्यांनी अंतराळात घालवलेला वेळ हा त्यांनी पृथ्वीवर कामानिमित्त घालवलेल्या वेळेप्रमाणेच गृहित धरला जातो. अंतराळात असताना त्यांना त्यांचे नियमित वेतन मिळत राहते, ज्यामध्ये नासा त्यांचे अन्न आणि  राहण्याचा खर्च देते.

नासाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, अंतराळवीर हे तांत्रिकदृष्टय़ा अडकलेले नाहीत, ते आयएसएसवर सातत्याने काम करत आहेत.

विल्यम्स आणि विल्मोर यांनी 287 दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवला आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येकी अवघे 1148 डॉलर्स (सुमारे एक लाख रुपये) जास्तीचा मोबदला मिळेल.

किती वेतन मिळणार

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जीएस-15 वेतन श्रेणीअंतर्गत येतात. ही वेतनश्रेणी सर्वात वरच्या पातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी असते. जीएस-15 कर्मचाऱ्यांना अंदाजे 1.08 कोटी रुपये ते 1.41 कोटी रुपये एवढे वार्षिक वेतन मिळते. नासामध्ये त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यावरून वेतन ठरते.

परतीचा प्रवास कधी?

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स या कंपनीने त्यांचे स्पेस क्राफ्ट क्रू-10 पाठवले आहे.  क्रू-10 वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी केलेले संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर 19 मार्च रोजी सुनीता विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील.