जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

विक्रम मिस्त्री नवे परराष्ट्र सचिव
विक्रम मिस्त्री यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 15 जुलैपासून ते आपला कार्यभार सांभाळणार आहेत. सध्या परराष्ट्र सचिवपदाची धुरा विनय मोहन क्वात्रा यांच्याकडे आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजीच संपला होता.

ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान
ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान पार पडणार आहे. हिंदुस्थानी वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पंझर्व्हेटिव्ह पक्षाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता बहुतेक सर्वेक्षणांनी वर्तवली आहे, परंतु खरे चित्र निकालानंतर स्पष्ट होईल.

1 जुलैपासून कार, स्कूटर महागणार
नवीन कार आणि स्कूटर खरेदीचा विचार करणाऱयांना 1 जुलैपासून अधिक पैसे मोजावे लागतील. टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवल्या. तर हीरो मोटोकॉर्पही निवडक स्कूटर-मोटरसायकलच्या किमतीत वाढ केली.

31 जुलै आयटीआर फाईलची डेडलाइन
देशातील कोटय़वधी नोकरदार वर्गांसाठी आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे. सरकारकडून कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आली नाही.

युद्ध अभ्यासासाठी शिवालिक सज्ज
दक्षिण चीन समुद्र आणि उत्तरी प्रशांत महासागरात तैनात असलेले हिंदुस्थानी युद्धनौका आयएनएस शिवालिक, रिम ऑफ द पॅसिफिक अभ्यास सरावासाठी पोहोचली. या ठिकाणी जगातील सर्वात मोठा नौदलाचा अभ्यास सराव होणार आहे. हिंदुस्थान आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय अभ्यास सराव पूर्ण करून आयएनएस शिवालिक पर्ल हार्बर येथे पोहोचली. आयएनएस शिवालिक समुद्रातील शत्रूंना जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे. प्रति तास 50 किलोमीटरच्या वेगाने चालणाऱया या युद्धनौकेवर बराक आणि ब्रम्होससारखे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वात जवळपास 29 देश रिम पॅक – 24 या अभ्यास सरावात सहभागी होत आहेत.